Satara News: डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी प्रशांत बनकरला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, सरकारी वकीलांनी आज काय युक्तिवाद केला?
Satara Doctor Crime News: फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्याप्रकरणी आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर कारवाई सुरु आहे. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोपाळच्या कस्टडीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे

Satara Doctor Crime
फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्याप्रकरणी आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर कारवाई सुरु आहे. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोपाळच्या कस्टडीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे
सातारा: फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. डॉक्टर तरुणीच्या हातावर नावे असणारे उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे घटनेनंतर फरार झाले होते. पोलिसांनी पहिल्यांदा प्रशांत बनकर याला अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपनिरीक्षक गोपाल बनकर हा रात्री ११ च्या सुमारास फलटण शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला होता. प्रशांत बनकर याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फलटणमधील जिल्हा उपरुग्णालयातील महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. तिने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. गोपाळने आपल्यावर चारवेळा अत्याचार केल्याचं तिने लिहिलं होतं, तर प्रशांतने गेल्या काही दिवसांपासून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप महिला डॉक्टरने नोटमध्ये लिहिला होता.
यानंतर पीएसआय गोपाळ बदनेला तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं तर प्रशांत बनकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला होता. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुन्यावण्यात आली होती. त्यात आज पुन्हा एकदा न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे बदनेला आता 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडी आहे.
दरम्यान, आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी जनसामान्यातून होत आहे. पण न्यायालयात या प्रकरणी वकिलांकडून युक्तीवादाची लढाईही सुरु आहे. या प्रकरणात सरकारी वकील क्षमा बांदल या युक्तीवाद करत आहेत. तर आरोपी प्रशांत बनकरच्या वतीने सुनील भोंगळ युक्तीवाद करत आहेत. गोपाळने महिला डॉक्टरला आत्महत्येला प्रवृत्त केलं, तिचा चार महिने मानसीक आणि शारिरीक छळ केला. यासंबंधीचे कॉल्स, कागदपत्रं सर्व पोलिसांना मिळालेले आहेत पण, त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी छळ कसा आणि कुठे केला हा तपास करण्यासाठी तसेच दोन्ही आरोपींचा एकमेकांशी संबंध आहे का हे तपासण्यासाठी पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. सदर मागणीला न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पोलिसांच्या बाजूने निर्णय देत गोपाळची कस्टडी वाढवली आहे.
याप्रकरणाचा तपास करुन आरोपींना शिक्षा देण्याचं आव्हान पोलिस आणि तपास यंत्रणांपुढं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी हे प्रकरण तरुणीने हातावर लिहून ठेवल्यामुळे स्पष्ट आहे आहे, आरोपींना कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार, असं स्पष्ट केलं आहे.
